1-3 वयोगटातील मुलींसाठी पौष्टिक पदार्थांची पाककृती

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Apr 13, 2021

लहान मुलांना सतत काय खाऊ घालवे असा प्रश्न आयांना नेहमी पडलेला दिसून येतो. बाळ 1 ते 3 वर्षाचे झाले की त्याला दात आलेले असतात. डॉक्टरांच्या मते, बाळ एक वर्षांचे झाले की आपण रोज ताटात जे खातो ते बाळाला पण देयला हवे. पण बाळासाठी कमी तिखट मीठ असलेले पदार्थ बनवणं जास्त उत्तम ठरू शकते.
लहान मुलांना खाण्यास पौष्टिक पदार्थ -
लहान मुलांसाठी काही सोपी सूप्स –
1. टोमॅटो सूप –
२ टोमॅटो, १ गाजर, कांद्याची एखादी फोड, १ बेबी बटाटा, २ मिरी दाणे, १ कप पाणी घालून कुकरच्या भांड्यात शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटा. लहान पाव कप दूध घाला. चिमूटभर साखर घाला. मीठ घाला. उकळून प्यायला द्या. थोड्या मोठ्या मुलांना (म्हणजे दीड वर्षापेक्षा जास्त), थोडी साय किंवा किसलेलं थोडंसं चीज घाला. याच पध्दतीनं लाल टोमॅटोऐवजी लाल भोपळा वापरूनही सूप करता येईल.
2. गाजर सूप –
२ गाजरं, २ बेबी बटाटे, १ लहान कांदा, २ मिरी दाणे असं सगळं कुकरच्या भांड्यात घाला. कपभर पाणी घालून शिजवा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटा. लहान पाव कप दूध घाला. मीठ घाला. उकळून प्यायला द्या. जरा मोठ्या मुलांना वरून थोडं लोणी घाला. याच पध्दतीनं गाजराऐवजी कोबी किंवा फ्लॉवर घालूनही सूप करता येईल.
3. पालक सूप –
अर्धी जुडी किंवा २० पालकाची पानं, १ टोमॅटो, १ बेबी पोटॅटो, कांद्याची मोठी फोड, ३-४ मिरी दाणे हे सगळं कुकरच्या भांड्यात घाला. शिजवून थंड करा आणि मिक्सरमध्ये वाटा. पाव कप दूध घाला. वरून थोडी साय किंवा चीज घाला किंवा किसलेलं पनीर घाला.
4. चिकन सूप –
कपभर चिकनचे सूप पीसेस (दुकानात तयार मिळतात) धुवून घ्या. थोड्याशा लोण्यावर किंवा तेलावर एक कांदा चिरून परता, त्यात ३ मिरी दाणे, २ लवंगा, १ लहान तुकडा दालचिनी घाला. त्यावर चिकनचे तुकडे घाला. मीठ घाला. हव्या असल्यास भाज्या घाला. मंद गॅसवर चिकनचा पूर्ण अर्क उतरेपर्यंत उकळा. नंतर चमच्यानं गरम मसाला काढून टाका. लहान मुलांना देताना चिकनची हाडं काढून द्या. हे सूप याच पध्दतीनं आजारी माणसांसाठी तसंच मोठ्या माणसांसाठीही करता येईल.
टोमॅटो वगळता कुठलंही सूप कधीही गाळू नका. कारण त्यातला चोथा निघून जाईल.
मुलांसाठी काही सोपा प्रकारचे अन्न -
1. खिचडी –
मूग, मसूर, सालीची मूग डाळ, तूर डाळ यापैकी कुठलीही एक डाळ आणि तांदूळ समप्रमाणात घ्या. स्वच्छ धुवून घ्या. थोड्याशा तूपावर मोहरी-जिरं घाला. कढीपत्त्याची ३-४ पानं घाला. डाळ-तांदूळ परता. त्यात चमचाभर दही घाला. दुप्पटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घाला. धणे-जिरे पूड आणि मीठ घाला. आवडत असतील तर थोडे शेंगादाणे घाला. खात असतील तर थोडं तिखट किंवा काळा मसाला घाला. वरून कोथिंबीर घाला. तयार खिचडीवर साजूक तूप घालून खायला द्या.
याच खिचडीत आवडीप्रमाणे भाज्या घालूनही खिचडी करू शकता.
2. पुलाव –
लांब तांदूळ तासभर आधी धुवून ठेवा. गाजर, फ्लॉवर, बटाटा, सिमला मिरची, फरसबी या किंवा आवडीप्रमाणे यापैकी कुठल्याही भाज्या शिवाय मटार घ्या. तूप गरम करा. त्यावर थोडा खडा गरम मसाला (२मिरी, २ लवंगा, २ वेलच्या, १ तमालपत्र) घाला. ते परतून भाज्या घाला. भाज्या परतल्या की तांदूळ परता. दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. शिजवा. आवडत असल्यास उतरवताना थोडं चीज किसून घाला. हा पुलाव डब्यात द्यायलाही उत्तम लागतो.
3. कॉर्न भात –
तांदूळ आणि उकडलेले कॉर्न दाणे समप्रमाणात घ्या. तुपावर थोडं जिरं घाला. एखादी कमी तिखट हिरवी मिरची मोठे तुकडे करून घाला. थोडंसं आलं किसून घाला. धुतलेले तांदूळ परता. नंतर त्यात कॉर्न दाणे घाला. दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. थोडा लिंबाचा रस घाला. शिजवा. यात हवं असल्यास किसलेलं गाजरही घालू शकता.
मटार भात – तांदूळ आणि मटार समप्रमाणात घ्या. तेलावर कांदा परता. नंतर त्यात टोमॅटो घालून परता. मग मटार घालून चांगलं परता. धुतलेल्या तांदळाला थोडा काळा मसाला चोळून घ्या. आता त्यावर तांदूळ परता. दुप्पट पाणी घाला. थोडासा लिंबाचा रस आणि मीठ घाला. शिजवा. वरून खोबरं-कोथिंबीर घालून द्या. याच प्रकारे तोंडली भातही करता येतो.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.


{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}
{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}