जाणता राजा मर्द मराठा शिवबा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Feb 18, 2022

शिवजयंतीच्या सर्वाना अनंत शुभेच्छा !
"मी माझ्या राजाला माझ्या हृदयात पाहिलं"
वर्षानुवर्षे लोटली शतक उलटली पण माझा राजा प्रत्येकाच्या हृदयात विराजमान आहे आणि राहील.
स्वबळावर राज्य स्थापन करणारा राजा "छत्रपती शिवाजी महाराज" (१९ फेब्रुवारी १६३० – ३ एप्रिल १६८०) शिवाजी महाराजांचे नाव मूळ देवी शिवाईच्या नावावरून ठेवण्यात आले, जिने जिजाऊची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण केली होती. मराठा राज्याचे संस्थापक, शिवाजी महाराज त्यांच्या स्वच्छ,निर्मळ प्रशासन, धैर्य आणि लढाऊ कौशल्यासाठी ओळखले जातात.
शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एखाद्या आख्यायिकेसारखे भासते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही निराश न होता महाराजांनी असे पराक्रम करून दाखवले आहेत, जे केवळ ऐकल्यामुळे अनेकांच्या भुवया आजही उंचावतात. महाराजांची मानसिक ताकद पराकोटीची होती. कितीही संकटे आली, तरी त्यांनी शांत राहून त्यातून मार्ग काढला. सकारात्मक गोष्टींचा आग्रह धरला.
पोवाडा
महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती
महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम
भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन
दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का!
नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,
कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार,
इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला
हम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला
नाव त्याच अफजलखान …२
जिता जागता जणू शैतान
खान बोलला छाती ठोकून,
शिवबाला टाकतो ठोकून
मरहबा, सुभानअल्लाह
कौतिक झाले दरबारात
खान निघाला मोठ्या गुरमित
त्याच घोडदल पायदळ
फौजा फाटा लई बक्कल
अंगी दहा हत्तीच बळ,
पाहणारा कापे चळचळ
वाटेत भेटेल त्याला चिरडीत,
ठेचीत खानाची सेना निघाली
गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली
आया बहिणींची आब्रू लुटली
कोण कोण रोखणार हे वादळ
आता शिवबाच काही खर नाही
इकडे निजाम, तिकडे मोगल
पलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला
राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार
काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार
अश्या वाघिणीचा तो छावा…. २
गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा
भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर,
प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान
हसत हसत कबूल केला, दिवस ठरला …
दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे
प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …३
आला बेगुमान नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची…..२
अन त्यास नाही जाणीव शक्तिची……२
अन करील काय कल्पना युक्तिची
हा जी जी जी …३
महाराजानी निरोप घेतला …२
न दंडवत घातला भावानीला
तसाच आई जिजाऊला
वकुत ह्यो वंगळ त्यों कसला
पानी आल आईच्या डोळ्याला
न सरदार लागला रडायला
अहो हे हे हे सरदार तर रडतीलच
पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला
अन गाई बघा लागल्या हम्बराया
असला बेहुद वकुत आला
दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा
अहो राजा हो जी र दाजी र जी जी …३
खानाच्या भेटीसाठी …२
महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता
भेटीसाठी छान उभारीला
नक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत डुलत आला …२
सय्यद बंडा त्याच्या संगतीला
शिवबाच्या संगती महाला
म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा
राजाला पाहून खान म्हणतो
आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ
खान हाक मारीतो हसरी …२
रोखून नजर गगनी
जी र जी जी …
पण आपला राजा …२
काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता
राजा गोर पहात त्याची न्यारी
चाल चित्याची सावध भारी
जी र जी जी …
खानान राजाला आलिंगन दिल
अन दगा केला
खान दाबी मानी मान्याला …२
कट्यारीचा वार त्यान केला …२
गर खरा आवाज झाला
चिलाखत व्हत अंगाला
खानाचा वार फुका गेला
खान यडबडला
इतक्यात महाराजानी
पोटामधी पिसवा ढकलला
वाघनखांचा मारा केला
हे टरटरा फाडल पोटाला
हे तडा गेला खानाचा कोथळा
बाहिर आला जी र जी जी …३
प्रतापगडाचे युद्ध जाहले …३
रक्त सांडले पाप सारे गेले
पावन केला क्रुष्णेचा घाट …२
लावली गुलामिची हो वाट …२
मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …३
(गीत - मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटातील)
जन्म इतिहास
महाराजांच्या जन्म-तिथीविषयी एकमत नाही.मराठी बखरींच्या आधारावरून त्यांचा जन्म १६२७ मध्ये झाला असे म्हणतात पण बहुतेक इतिहाससंशोधकांनी आणि आता महाराष्ट्र शासनानेही निश्चित केली आहे की महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० झाला. महाराष्ट्र राज्याचे संस्थापक जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दांपत्यापोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहागीर शहाजींच्या नावाने राहिली. निजामशाहीतील दरबारी कारस्थानात शहाजीं यांनी नाराज होऊन त्यांनी निजामशाहीची नोकरी सोडली.
बालपण
शिवाजी महाराजांनी आपल्या बालपणीच मावळ्या सोबत विविध उपक्रम हाती घेतले. महाराजांना बालपणीच स्वतः राजा बनुन आपल्या बालमित्राच्या समस्या सोडवायला आवडे. गनिमी काव्याने युद्ध नीती लहानपणीच राजेंनी आत्मसात केली. चपळ आणि तल्लख बुध्दी च्या जोरावर आपल्या उपक्रमाची सुरुवात सावधपणे केली. आपल्याशी सहमत होणारे समवयस्क तरुण त्यांनी जमविले.मराठा सैन्याद्वारे गनिमी काव्याचे तंत्र अवगत करणारे ते पहिले होते. गड किल्यावर अधिराज्य गाजवायला सुरवात केली. महाराजांनी आसपासच्या परिसरातील मोकळ्या टेकड्या, पडके किल्ले, दुर्गम स्थळे हळूहळू आपल्या ताब्यात आणली.
- शिवाजी महाराजांचा सईबाई (निंबाळकर) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला. महाराजांना सईबाईपासून संभाजी (महाराज) सारख्या तेजस्वी पूत्र प्राप्ती झाली.
- राजगड आणि तोरणा किल्ला (प्रचंडगड) महाराजांनी हस्तगत केला. महाराजांना येऊन मिळालेल्या अनुयायांत पुढे प्रसिध्दीस आलेली कान्होजी जेधे, नेताजी पालकर , तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर इ. नावे आढळून येतात.
- चोहोबाजुतील मराठा सरदारांना एकत्रित करण्यास शिवाजी महाराजांचा सिहांचा वाटा होता. शिवाजीने मराठी आणि संस्कृतसारख्या प्रादेशिक भाषांचा वापर न्यायालय आणि प्रशासनात केला आणि आपल्या काळातील नेहमीची भाषा फारसी सोडली.
शिवाजी महाराज एक आदर्श
शिवाजी महाराजांची राहणी एकदम साधी होती कारण . स्वारीला गेल्यावर महाराज साध्या तंबुत राहत होते. एवढे अधिकार, एवढे वैभव असूनही महाराज साधेपणाने वागायचे. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराज प्रोत्साहन द्यायचे, त्यांचं मनोबल वाढवायचे, त्यांना प्रेरित करायचे, उत्साह वाढवायचे. महाराज कधीही दुःखी कष्टी राहायचे नाहीत. सकारात्मकतेचा प्रेरणास्त्रोत असलेल्या महाराजांमुळे सर्वांमध्ये एक वेगळी उर्जा यायची. प्रत्येक मावळ्याचे शिवाजी महाराज आदर्श होते.
तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.
.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.